सुरुवात , १५ ऑगस्ट २०१६

नदी खाडी पर्वत समुद्राने वेढलेला आपला निसर्गरम्य परीसर आता बेलगाम कॉंक्रीटच्या विळख्यात जातो आहे. १०० वर्षांपूर्वी *Loungs of Mumbai* मुंबईची फुफ्फुसे म्हणून ओळखला जाणारा वसईविरारचा ऐतिहासिक भूभाग आता अतिक्रमणाने प्रदूषित होतो आहे.
मुळचे वसईविरारचे रहिवासी आता इथल्या निसर्गदत्त देणग्यांपासुन तोडले जात आहेत. सुपीक जमीन, शुद्ध हवा आणि ताजे पाणी हा स्थानिकांचा हक्क हिरावला गेला आहे.
वसईविरारच्या इतिहासात कधीही पुर आला नव्हता, गेल्या १५ वर्षात त्याला सुरुवात झाली आहे. बिल्डर लॉबीने उभारलेल्या अनधिकृत कॉंक्रिटच्या जंगलामुळे पिण्याचे पाणी नाहीसे झाले. पावसाळ्यात दोन महिने गटाराचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळते आहे, उरलेले १० महिने तुटपुंजे पाणी नळाने येते. टॅंकर लॉबी आणि अवैध पाणी प्रकल्प चालक पाण्याचे साठे उपसुन उरल्यासुरल्या जीवनरेषेवर शेवटचा वार करत आहेत.
अमर्याद अनधिकृत बांधकामामूळे रस्ते वीज पाणी आरोग्य ह्या सेवांवर ताण पडतो आहे. असह्य गर्दीत करावा लागणारा रेल्वेचा जीवघेणा प्रवास ( दररोज २० अपघात पश्चिम रेल्वेवर होत आहेत ) , खड्ड्यात गेलेले प्रदूषित रस्ते (रेल्वे स्टेशन ते गावापर्यंतचा प्रवास धुराने भरलेला आहे, ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर धुराने जीव गुदमरतो). पण वसईविरारमध्ये सुसज्ज सरकारी आरोग्यसेवा त्वरित उपलब्ध होत नाही.
प्रचंड प्रमाणात वाढलेल्या गुन्हेगारी आणि अनैतिक धंद्यानी वसईविरारच्या  शांतताप्रिय सुसंस्कृत आगरी, पानमाळी, भंडारी, ब्राम्हण, कोळी, मांगेला, आदिवासी, मुसलमान व ख्रिश्चन समाजाची हानी केली आहे. मुळच्या भूमिपुत्रांना स्वतःच्या जमिनीवर बांधकाम करण्यासाठी आडकाठी येते , पण अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नाही.
आपण सर्व निरनिराळ्या क्षेत्रात कार्यरत आहोत, धर्म जात पंथ भाषा राजकीय विचारसरणीपलीकडे आपल्याला प्रस्थापित भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढा देण्यासाठी एकत्र यायचे आहे.
मार्गदर्शन : *माननीय फादर फ्रांसिस दिब्रिटो*
वेळ : *१५ ऑगस्ट, सकाळी १० वाजता,*
स्थळ : *उष:काल, निर्मळ.*
समन्वयक : *समीर सुभाष वर्तक*

No comments:

Post a Comment